"‘आता पुरे झालं!’ पुष्कर जोगचा पाकिस्तानला इशारा"

"‘आता पुरे झालं!’  पुष्कर जोगचा पाकिस्तानला इशारा"

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअरस्ट्राइक केला. या कारवाईनंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे, आणि अनेक भारतीय याचे कौतुक करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर अभिनेता पुष्कर जोगनेही आपला संताप व्यक्त केला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, "काही लोक म्हणतात राजकारण आणि मनोरंजन वेगळं आहे, पण हे लॉजिक चुकीचं आहे. पाकिस्तानी कलाकार भारतात येऊन पैसे कमावतात आणि तोच पैसा दहशतवादाला पोसतो."

पुष्करने पुढे सांगितले, "हे आपण डोळसपणे पाहायला हवं. शहीदांचा अपमान सहन होणार नाही. देशाने खूप सहन केलं, आता पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याची वेळ आली आहे. तेथील लोक जरा आगाऊ आहेत; २६/११, पुलवामा, आणि आता पहलगाम.  किती दिवस आपण सहन करणार?"

 "माझ्या सोशल मीडियावर काही पाकिस्तानी ओळखीचे होते जे यूकेमध्ये राहतात. मी त्यांना अनफॉलो केलं कारण भारत माझ्यासाठी आधी आहे. जेव्हा पाकिस्तानी लोक हल्ल्याचा निषेध करायचा सोडून लढण्यासाठी तयार असल्याचं सांगतात, तेव्हा त्यांना दहशतवाद्यांविरुद्ध मदत करायला हवी होती. त्यांचा हा निर्लज्जपणा पाहून मला राग येतो." असंही पुष्कर जोग म्हणाला.