विश्व् विख्यात तबला वादक झाकीर हुसेन

मुंबई वृत्तसंस्था: संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानला जाणारा ग्रॅमी पुरस्कार चारवेळा मिळवणारे, तीन नागरी पुरस्कार मिळवणारे, जगातील सर्वोत्तम तबला वादकांपैकी एक असणारे झाकीर हुसैन यांचं रविवारी निधन झाले. ग्रॅमी पुरस्कारांसाठी झाकीर यांना सातवेळा नामांकन मिळालं होतं. यापैकी चार वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यांना पद्म्श्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन भारत सरकारने सन्मान केला.
सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्ला रखा यांचे ते पुत्र. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी संगीताचा पाहिला कार्यक्रम केला. जागतिक पातळीवरील पहिला प्रयोग वयाच्या ११ व्या वर्षी सॅन फ्रान्सिस्को येथे केला. एवढ्याश्या हातातील तबला वादनाचे कसब पाहून श्रोते भारावून गेले. यानंतर ते मागे वळून पहिलेच नाही. त्यांचा तबल्याचा ठेका, गोऱ्यापान चेहऱ्यावरील तबल्याच्या ठेक्यानुसार बदलणारे भाव आणि मानेवर रुळणारे केस ही त्यांची खास ओळख बनली होती.
झकीर हुसेन याची ओळख जगप्रसिद्ध तबला वादक असली तरी ते अभिनेतेही होते. त्यांनी १२ चित्रपटात काम केले आहे. झाकीर यांनी १९८३ मध्ये आलेल्या 'हिट अँड डस्ट '' या इंग्रजी चित्रपटात शशी कपूर सोबत काम केले होते. अमिरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर यांना ऑल स्टार ग्लोबल कौन्सर्ट मध्ये खास आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम करणारे ते एकमेव भारतीय कलाकार आहेत.
हुसेन याचे जागतिक संगीत क्षेत्रात नाव मोठे आहेच. मात्र "वाह ताज" या एका चहा कंपनीच्या जाहिरातीमुळे ते घराघरात पोहचले. या जाहिरातीतील लांबसडक करली केसांच्या हेअर स्टाइलमुळे प्रेक्षकांचे लक्ष जाहिरातीकडे वेधत होते. कंपनीच्या करारामुळे त्यांना लांबसडक केस तसेच ठेवावे लागले. उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाबद्दल शास्त्रीय संगीतकार उस्ताद वसीफुद्दीन डागर यांनी पीटीआयला सांगितले, "झाकीरभाई हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांचे जाणे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर करोडो लोकांची मने जिंकली."