आमटेंचं आनंदवन हादरलं;धारदार शस्त्राने महिलेचा खूण

आमटेंचं आनंदवन हादरलं;धारदार शस्त्राने महिलेचा खूण

चंद्रपूर प्रतिनिधी : बाबा आमटेंच्या आनंद वनात धारदार शस्त्राने महिलेचा खून करण्यात आला. ही दुर्दैवी घटना २६ जून रोजी घडली. आरती दिगंबर चंद्रवंशी नावाच्या २४ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या वडिलांच्या घरी अज्ञात आरोपीने शस्त्राने वार करून खून केला. ही घटना बाबा आमटे यांच्या आनंदवन परिसरात पहिल्यांदाच घडली आहे.

आरतीचे वडील अंध असल्याने ते आणि त्यांची पत्नी उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. त्यावेळी आरती घरात एकटीच होती. रात्री आई-वडील घरी परतल्यानंतर त्यांनी आरतीला बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. तिच्या गळ्यावर शस्त्राचे वार केलेले दिसले आणि सर्वत्र रक्त साचले होते.

पोलिसांना माहिती देण्यात आली आणि लगेच पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम आणि पोलीस निरीक्षक अमोल काचोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील चौकशी सुरू केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.