'आसमा' च्या अध्यक्षपदी अमरदीप पाटील तर उपाध्यक्षपदी संजय थोरवत

'आसमा' च्या अध्यक्षपदी अमरदीप पाटील तर उपाध्यक्षपदी संजय थोरवत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दक्षिण महाराष्ट्रातील ॲडव्हर्टायझिंग एजन्सिज व जाहिरात व्यवसायास पूरक सेवा देणाऱ्या विविध घटकांच्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज अँड मीडिया असोसिएशन (आसमा) या संघटनेच्या अध्यक्षपदी अमरदीप पाटील (ॲडफाईन) यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय थोरवत (गणेश प्रिंटर्स), सचिवपदी शिरीष खांडेकर (निर्मिती ॲडव्हर्टायझिंग) व खजानीसपदी राजाराम शिंदे (अलंकार पब्लिसिटी) यांची निवड करण्यात आली.

 

संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या सन २०२५ - २७ या द्वैवार्षिक निवडणुकीत वरीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. संचालकपदी अभय मिराशी, संजय रणदिवे, विवेक मंद्रुपकर, अविनाश पेंढुरकर, अमरसिंह भोसले, अतुल उपळेकर, शैलेश गर्दे, प्रशांत बुचडे, अनिरुद्ध गुमास्ते, किरण वडगावकर व प्रशांत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. सुरुवातीला दै. केसरीचे संपादक दिपक टिळक यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रारंभी मावळते अध्यक्ष सुनील बासरानी यांनी सर्वांचे स्वागत करून गतवर्षातील संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सचिव संजीव चिपळूणकर यांनी कार्यअहवाल मांडला. खजानीस राजाराम शिंदे यांनी ताळेबंद अहवाल व नफा-तोटा पत्रक सादर केले. विषय पत्रिकेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. जाहिरात व्यवसायातील अडचणींबाबत व बदलत्या प्रवाहाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. जाहिरात व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करू असे मनोगत नूतन अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. बदलत्या काळानुसार जाहिरात एजन्सीनी प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करून परिपूर्ण सेवा देण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

'फेम' या राज्यस्तरीय संघटनेच्या संचालकपदी सुनील बासरानी तसेच खजानिसपदी कौस्तुभ नाबर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार फेमचे माजी अध्यक्ष महेश कराडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनंत खासबारदार, चारुदत्त जोशी, महादेव शिंदे, संजय होगाडे, शरद पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. मनीष राजगोळकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सचिव शिरीष खांडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी  कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी येथील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.