उद्योजकांना कमी दरात वीज आणि कुशल रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील राहणार - आमदार अमल महाडिक यांची ग्वाही

उद्योजकांना कमी दरात वीज आणि कुशल रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील राहणार - आमदार अमल महाडिक यांची ग्वाही

कोल्हापूर प्रतिनिधी : आमदार अमल महाडिक यांनी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहती मधील गोशिमा कार्यालयाला भेट दिली. यावेळी गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम यांच्यासह उद्योजकांनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर झालेल्या बैठकीत उद्योजकांनी आपल्या व्यथा मांडल्या. इतर राज्यांच्या दराबरोबर महाराष्ट्रातील वीजदर करावेत आणि पुढील तीन वर्षे हे दर स्थिर ठेवावेत अशी विनंती उद्योजकांनी आमदार महाडिक यांना केली.

यावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार महाडिक यांनी दिले. काही उद्योजकांना त्यांची सबसिडी वेळेत मिळत नसल्याकडेही गोशिमा सदस्यांनी आमदार महाडिक यांचे लक्ष वेधले. याही संदर्भात उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन अडचणींवर मात करून वेळेत सबसिडी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन महाडिक यांनी दिले. 

फाउंड्री अँड इंजीनियरिंग क्लस्टर या प्रकल्पासाठी मंजूर भूखंडावर उभारलेल्या कॉमन फॅसिलिटी सेंटर साठी निधी देण्यासह सेंटर ऑफ एक्सलन्स साठी तीन कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी उद्योजकांनी केली. या मागणीसाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे महाडिक म्हणाले. सद्यस्थितीत गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग विस्तारासाठी नवीन जागा उपलब्ध नाही त्यामुळे उद्योग वाढीस खीळ बसत आहे. याचा विचार करून कागल औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी विकसित न केलेले आणि विवादात असलेले भूखंड परत घेऊन विस्तारासाठी इच्छुक उद्योजकांना द्यावेत या उद्योजकांच्या मागणीचाही शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली.

त्याचबरोबर औद्योगिक वसाहतींमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहील. त्यासाठी प्रशिक्षण संस्थांना सक्षम केले जाईल. उद्योजकांनीही या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार अमल महाडिक यांनी केले. औद्योगिक वसाहती मधील रस्ते रुंदीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, अखंडित वीज पुरवठा, सुरक्षा व्यवस्था यासह विविध मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी दिला.यावेळी गोशिमा उपाध्यक्ष सुनील शेळके, सचिव संजय देशिंगे, खजानीस अमोल यादव, दीपक चोरगे, मंगेश पाटील,सत्यजित जाधव, राजवर्धन जगदाळे, रामचंद्र लोहार, नचिकेत कुंभोजकर यांच्यासह अन्य उद्योजक उपस्थित होते.