सिमला कराराच्या इतिहासाला धक्का; भारत-पाक संबंधांमध्ये नव्याने तणाव

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर राजनैतिक निर्णयांमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी मोठा पलटवार केला. पाकिस्तानने सिमला करारासह भारताशी असलेले सर्व द्विपक्षीय करार रद्द करत भारताविरुद्ध तीव्र भूमिका घेतली आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बोलावण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत, भारताशी सुरू असलेला व्यापार तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाईक्षेत्र महिनाभरासाठी बंद करण्याचा इशाराही दिला आहे. सिंधू पाणीवाटप करारही स्थगित करत, भारताने पाणी वळवण्याचा प्रयत्न केल्यास ते युद्ध समजले जाईल, असा इशाराही दिला आहे.
पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या 30 पर्यंत मर्यादित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
सिमला करार : एक ऐतिहासिक दुव्याची आठवण
सन 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली सिमला करार झाला होता. या करारात शांतता, द्विपक्षीय चर्चा आणि युद्ध टाळण्यावर भर देण्यात आला होता. 90,000 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करापुढे शरणागती पत्करली होती आणि त्यानंतर नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली होती.
पाकिस्तानच्या निर्णयाचे संभाव्य परिणाम
या निर्णयामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नियंत्रण रेषेवर चकमकी होण्याची शक्यता वाढू शकते, तर युद्धजन्य परिस्थिती उद्भवू शकते. भारत आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानविरोधात कारवाईची मागणी करू शकतो.
भारताची प्रतिक्रिया काय असू शकते?
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, भारत कठोर राजनैतिक आणि लष्करी भूमिका घेऊ शकतो. सीमेवरील सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर अलग ठेवण्याचे प्रयत्न सुरू होतील.