बाजार समिती कचऱ्यापासून उभारणार सौरऊर्जा प्रकल्प;सचिवांना मुदतवाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कचऱ्यापासून सौरऊर्जा प्रकल्प उभा करणार असून, त्याला मंगळवारच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्यता देण्यात आली. खासगी कांदा-बटाटा मार्केटबाबत बैठकीत जोरदार चर्चा झाली. काही व्यापाऱ्यांनी सभापतींची भेट घेऊन आम्ही मार्केटमध्येच राहू, अशी ग्वाही दिली.
तसेच सचिव जयवंत पाटील हे ऑक्टोबरमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.
विविध विभागांतील कचरा रोज तीन टनांपर्यंत संकलित होतो, त्यापासून ऊर्जा निर्मितीचा निर्णय घेतला आहे. त्यास मान्यता देतानाच कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या मुद्यावर चर्चा झाली. नियमानुसार पदोन्नती केली जाईल, असे सांगितले. काही व्यापाऱ्यांनी कोल्हापूर ते कागलपर्यंत खासगी मार्केट उभे करण्याचा निर्णय घेतला. त्याचे पडसाद सभेत उमटले. समिती चांगल्या सोयी-सुविधा देते तरीही काही व्यापारी बदनामी करत असल्याचा आरोप करत दोन संचालकांत खडाजंगी झाली. दरम्यान, कांदा-बटाटा मार्केटमध्ये चांगल्या सोयी-सुविधा देत असून आम्ही कोठेही जाणार नाही, येथे राहू, अशी ग्वाही देत चांगल्या मार्केटला कोणी गालबोट लावत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. आम्ही समितीसोबत असल्याचे पत्र उदय देसाई, बाजीराव पडवळ आदींनी सभापती अॅड. प्रकाश देसाई यांना दिले. नंदकुमार वळंजू, कुमार आहुजा, दिलीप पोवार, सचिव जयवंत पाटील, बाबूराव येडगे, संजय तेंडुलकर, दगडू जानकर, विठ्ठल शेळके, सुशील चौगले, बबन कात्रट, दगडू लव्हटे, दीपक लव्हटे, सुरेश मालप, आदी उपस्थित होते.