कर्नाटक राज्य स्थापत्य अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - युवा बौद्ध धम्म परिषदेच्या सातत्यपूर्ण कृती कार्यक्रमांतर्गत कर्नाटक राज्य स्थापत्य दौरा ७ जून ते १२ जून दरम्यान आयोजित करण्यात आला होता. हा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न झाला.
या दौऱ्याची सुरुवात कोल्हापूर येथील दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन झाली. यावेळी मुस्लिम बोर्डींगचे चेअरमन गणीभाई आजरेकर दौऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. या दौऱ्यात ६० लोकांनी सहभाग नोंदवला.
या अभ्यास दौऱ्यामध्ये बदामी येथील भूतनाथ लेणी संकुल, अगस्त्य तलाव, पुरातत्वीय वस्तुसंग्रहालय, बदामी गुहा मंदिरे लेणी क्रमांक १, २, ३, निसर्गनिर्मित गुहा (बदामी बौद्ध लेणी क्रमांक १, पट्टदकल येथील युनेस्को हेरिटेज साईट मंदिरे, पापनाथ मंदिर या ठिकाणांसह अनेक ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे पाहण्यात आली.
या दौऱ्याचे मार्गदर्शन बौद्ध लेणी, मूर्तीशास्त्र, पुरातत्वशास्त्र अभ्यासक आयु. अशोक नगरे यांनी केले. डेहराडून, सोलापूर, मुंबई, ठाणे, पुणे, वाई, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्ध तसेच इतर धर्मीय बांधव या दौऱ्यामध्ये सहभागी होते. या दौऱ्याचे नियोजन राज्याध्यक्ष संतोष भोसले, राज्यसचिव सतीश भारतवासी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राजहंस यांनी केले होते.