केआयटी मध्ये पायोनियर २५ चे उद्घाटन संपन्न; ३५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

केआयटी मध्ये पायोनियर २५ चे उद्घाटन संपन्न; ३५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

   कोल्हापूर (प्रतिनिधी) :   कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा पायोनियर २५ चे उद्घाटन पुणे येथील कॉग्नीजंट या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ एचआर मॅनेजर, शिल्पा महाजनी यांच्या हस्ते संपन्न झाले.

 यावेळी संचालक डॉ. मोहन वनरोट्टी म्हणाले केआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या स्टार्ट अप्स साठी एक उत्तम इकोसिस्टीम कार्यरत करण्यात आलेली असून त्याच्या माध्यमातून आजपर्यंत २५ स्टार्टप्स प्रोजेक्ट ना भरीव आर्थिक सहाय्य केले गेले आहे.पायोनियर-२५ या स्पर्धेतील उत्तम टेक्निकल पेपर व प्रोजेक्ट यांना भविष्यात स्टार्ट अप्स मध्ये रूपांतरित करण्याबाबत केआयटी आय.आर.एफ. च्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न केले जाणार आहेत.

मुख्यअतिथींचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले. पायोनियर २५ चे निमंत्रक प्रमोद जाधव यांनी या वर्षीच्या स्पर्धेचा विस्तृत आढावा मांडला. 

कार्यक्रमाच्या उद्घाटक शिल्पा महाजनी यांनी वर्तमान व भविष्य काळामध्ये उद्योग जगताला स्वतःला आत्मविश्वासाने सादर करणारे,नेतृत्व करू शकणारे, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, सर्व समावेशक वृत्तीचे, प्रामाणिक व एक चांगला व्यक्ती म्हणून वावरणारे तरुण अभियंते हवे आहेत अशा अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या.स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या विचारांना स्पष्ट दिशा मिळते तसेच सहकार्य, सकारात्मकता,निर्णय क्षमता गुणांची वृद्धी होत असते व अशा संधी भविष्यात स्वतःला अधिक कार्यक्षम करण्यासाठी पूरक ठरतात अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पायोनियर सारख्या कार्यक्रमातून आयोजक व सहभागी विद्यार्थ्यांना अशा आवश्यक गुणांची जोपासना करण्याची संधी मिळत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष साजिद हुदली म्हणाले, “ भारताची तरुणाई ही भारताची ताकद आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय ठरवताना कोणत्या दिशेला आपल्याला जायचे आहे, आपल्या जीवनाचा हेतू काय आहे याबाबत सजग राहिले पाहिजे.आज आपला देश सर्वच अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आधुनिकतेची कास धरत मार्गक्रमण करत आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा भविष्याचा वेध घेत वर्तमानामध्ये स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. “ फक्त बाह्य गोष्टीला महत्त्व न देता स्वतःला सर्व बाजूंनी विकसित करण्यावर आपण भर दिला पाहिजे ” असे त्यांनी सांगितले.  

भारतातून केआयटी इंजिनिअरिंग कॉलेज,चीनमधील निंगशिया युनिव्हर्सिटी, यिनचुआनव, पोलंड मधील ए.जी.एच. युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६-१७ मे २५ रोजी भारतात व २४-२५ मे २५ रोजी चीनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे..या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेच्या वेबसाईटचे, तसेच माहितीपत्रकाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष हुदली यांच्या हस्ते याचवेळी करण्यात आले. 

या स्पर्धेसाठी गोवा दिल्ली पंजाब तमिळनाडू ओरिसा छत्तीसगड या राज्यातूनही स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य उद्घाटक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे,अध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सुनील कुलकर्णी,संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, अधिष्ठाता विद्यार्थी उपक्रम डॉ.जितेंद्र भाट,आय.एस.टी.ई.प्राध्यापक समन्वयक प्रा.अश्विनी शिंदे, निमंत्रक पायोनियर २५ प्रा.प्रमोद जाधव उपस्थित होते. आय.एस.टी.ई.स्टुडंट चाप्टरच्या अध्यक्ष शिवांजली पाटील यांनी उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन केले. निर्मल खोपडे, हार्दिक अग्रवाल, ऐश्वर्या कामत, भक्ती हुद्दार, अमन कुरेशी या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अधिष्ठाता, विभाग प्रमुख ,प्राध्यापक, स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.