कोरे अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा १४ जूनला मुंबईत

कोरे अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा १४ जूनला मुंबईत

वारणानगर (प्रतिनिधी) : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस), वारणानगर – वारणा विद्यापीठ संलग्नित या नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा दुसरा भव्य मेळावा शनिवारी १४ जून रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा हॉटेल रंगशारदा, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणार आहे.

या मेळाव्यासाठी आतापर्यंत ३०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, मुंबई तसेच उपनगरांमधून व देश - विदेशातून ५०० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देत, नव्याने स्थापन झालेल्या वारणा राज्य सार्वजनिक समूह विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या व होणाऱ्या विविध उपक्रमांची आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन साधले जाणार आहे.

या विशेष सोहळ्याला वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याचे सुयोग्य आयोजन व नियोजन अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्र. प्राचार्य डॉ. डी. एन. माने, व माजी विद्यार्थी समिती समन्वयक प्रा. बी. आर. बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

सर्व माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून आपले संस्थेशी असलेले नाते अधिक दृढ करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.