‘गोकुळ’चा कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दर ३० रुपये

‘गोकुळ’चा कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दर ३० रुपये

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक बाजारपेठेत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याने महाराष्ट्रामध्ये खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २७.०० रुपये पर्यंत कमी झाले होते. म्हणून गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतेच गाय दूध खरेदीसाठी दि.०१/०७/२०२४ इ.रोजी पासून प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले. परंतु या अनुदानास पात्र होण्यासाठी  प्रतिलिटर किमान ३० रुपये दर देण्याची अट आहे. सध्या गोकुळ दूध संघामार्फत जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३३.०० रुपये तर जिल्ह्याबाहेरील गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर २८.५० रुपये दर दिला जात आहे.

 शासनाच्या गाय दूध अनुदानास पात्र होण्यासाठी यापूर्वी कार्यक्षेत्राबाहेरील कमी केलेले दरात वाढ करून गाय दूध खरेदीचा दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ गुणप्रतीस प्रतिलिटर ३० रुपये इतका करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्‍या मिटिंगमध्‍ये घेण्‍यात आला असून या निर्णयाचा फायदा गोकुळच्या सांगली, सोलापूर, कर्नाटक, कोकण येथील गाय दूध उत्पादकांना होणार आहे. तथापि, जिल्ह्यातील गाय दूध खरेदी दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.

सध्या गोकुळचे कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध संकलन प्रतिदिनी सुमारे दोन लाख लिटर्स इतके असून या दर वाढीमुळे गोकुळच्या कार्यक्षेत्राबाहेरील ३५ हजार गाय दूध उत्पादकांना फायदा होणार आहे. सदरची दर वाढ ही दि.०१/०७/२०२४ इ.रोजी पासून लागू होणार असून त्याबाबतचे सुधारित दरपत्रक संबधीत  दूध संस्थांना पाठवण्यात येणार आहे.