घरकुले १०० दिवसांत पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलेल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कागल प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात एकाच दिवशी रेकॉर्डब्रेक दहा लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे व पहिला हप्ता जमा होत आहे. ही घरकुले येत्या १०० दिवसात पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलेल, असे उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. ही सर्व घरकुले पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कागल ममध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -दोन अंतर्गत ५, ०३८ लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे आणि डी. बी. टी. द्वारे पहिल्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती -कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वतःच्या डोकीवर आपल्या हक्काचा निवारा असावा असे गोरगरीब बेघर माणसाचा अंतिम हेतू असतो. घरकुलाच्या रूपाने त्याची अनेक दिवसांची अपेक्षापूर्ती होत असते. गेल्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री पदावर असताना महाआवास योजनेच्या माध्यमातून राज्यात लाखो घरकुलांची कामे पूर्ण होऊन गोरगरिबांना कायमस्वरूपी निवारा मिळाला. त्या काळात जागा घरकुलाच्या बांधकामासाठी जागा नसणाऱ्यांना जागा मिळवून दिल्या, अतिक्रमणे नियमित केली, वाळू टंचाईवर मात करून वाळूही उपलब्ध करून दिली, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.
*तो आनंद आणि समाधानही मोठे......!*
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आपलं स्वतःच हक्काचं घर असावं हे अनेकांचं वर्षानुवर्षाचं स्वप्न असतं. अशी घरकुले पूर्ण झाल्यानंतर मी ज्या -ज्या ठिकाणी वास्तुशांती आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जातो त्या कुटुंबांचा आनंद गगनात मावेनासा असतो. त्या कुटुंबातील पत्नी बर्शन कट्ट्यावर जेवण करीत असते, मुले खोल्यांमध्ये बसून अभ्यास करीत असतात, वृद्ध माणसं टी. व्ही बघत असतात. हे चित्र मनाला सुख आणि समाधान देत......!
या कार्यक्रमात अंगणवाड्यांना खेळण्यांचे व महिला बचत गटांना साहित्याचेही वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले.
व्यासपीठावर प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर, तालुकाआरोग्य अधिकारी डाॅ. फारुख देसाई, पाणीपुरवठा उपअभियंता सचिन देशमुख, गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. जयश्री नाईक, नासिर नाईक, माजी सभापती जयदीप पोवार, राजेंद्र माने, विजय भोसले, राहुल महाडिक, संग्राम सावंत, राजेंद्र सुतार आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद कुमार तारळकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले.