जि. प. कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी धरणे आंदोलन
कोल्हापूर (प्रतिनिधि) : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (दि. ९) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने पत्रकाद्वारे दिली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक समन्वय समितीने १४ डिसेंबर २०२३ रोजी बेमुदत संप पुकारला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. यामध्ये जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच आर्थिक व सामाजिक लाभाची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिसूचना, शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ८ महिने उलटले तरी अद्यापही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शुक्रवारच्या आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव, लिपिकवर्गिय संघटनेचे अध्यक्ष नीलेश म्हाळुंगेकर यांनी केले आहे.