त्रिभाषा धोरणाला राज्यभरातून विरोध ; सरकारने माघार घेतल्यानंतर ५ जुलैला 'मराठी विजय मेळावा'

त्रिभाषा धोरणाला राज्यभरातून विरोध ; सरकारने माघार घेतल्यानंतर ५ जुलैला 'मराठी विजय मेळावा'

मुंबई - राज्यात त्रिभाषा धोरणावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर सरकारने त्याचा शासकीय निर्णय (जीआर) मागे घेतला आहे. तिसऱ्या भाषेसाठी हिंदी सक्तीचा मुद्दा समोर आल्यानंतर जनतेत तीव्र संताप पसरला. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत सरकारविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याआधीच सरकारने जीआर रद्द करत माघार घेतली. आता, ५ जुलै रोजी मराठी विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या वरळीतील डोम सभागृहात हा भव्य मेळावा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांच्या मनसेने एकत्रितपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र व्यासपीठावर येण्याचे ठरवले आहे.

राजकीय दृष्टीनेही महत्वाचा मेळावा - 

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांची ही एकजूट राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेना (UBT) कडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई हे पुढाकार घेत आहेत.

'मराठी माणसाची एकजूट, सरकारची माघार' - 

हिंदी सक्तीविरोधात मराठी जनतेने घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे सरकारला अखेर निर्णय मागे घ्यावा लागला. ही मराठी माणसाच्या एकतेची मोठी विजयगाथा मानली जात आहे. त्यामुळे ५ जुलैचा दिवस 'मराठी विजय दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे.

ठाकरे एकत्र, युतीच्या चर्चांना उधाण - 

या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चांना नवसंजीवनी मिळाली आहे. शिवसेनेच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून "ठरलं! ठाकरे येत आहेत" असा संकेतात्मक संदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या मेळाव्याने मराठी अस्मिता, भाषा आणि एकतेचा नवा उभारी मिळणार हे निश्चित.