सावनूर-हुबळी रस्त्यावर ट्रक दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

बेंगळुरू: सावनूर-हुबळी रस्त्यावर येल्लापूर येथे आज पहाटेच्या सुमारास फळांचा ट्रक दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला २० व्यक्ती जखमी झाला . यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. माहिती मिळताच पोलीस तत्काळ आले. अपघाताचे दृश्य पाहून पोलिसही हादरले.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फळ-भाज्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाने दुसऱ्या वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात ट्रक डावीकडे वळवला. मात्र, तो जास्तच वळवण्यात आल्याने ट्रक सुमारे ५० मीटर खोल दरीत कोसळला. उत्तर कन्नडचे पोलीस अधीक्षक एम. नारायण यांनी सांगितले की, मृत हे फळ विक्रेते होते आणि सावनूर येथून येल्लापुरा जत्रेत फळे व भाज्या विकण्यासाठी जात होते. सावनूर-हुबळी रस्त्यावरील जंगली भागातून जात असताना हा अपघात झाला.अपघातस्थळी आठ जणांचा मृत्यू झाला तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींना हुबळी येथील कर्नाटक वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्था (KIMS) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.