धक्कादायक : कुटुंबाच्या प्रतिष्ठेला तडा दिल्याच्या रागातून मामानेच भाचीच्या रिसेप्शनमध्ये जेवणात टाकले विषारी औषध

धक्कादायक : कुटुंबाच्या प्रतिष्ठेला तडा दिल्याच्या रागातून मामानेच भाचीच्या रिसेप्शनमध्ये जेवणात टाकले विषारी औषध

कोल्हापूर : प्रेमविवाहामुळे भाचीने कुटुंबाच्या प्रतिष्ठेला तडा दिल्याच्या रागातून मामाने लग्नाच्या रिसेप्शनमध्ये जेवणात विषारी औषध टाकण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रकार आचारीने वेळेवर पाहिल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

समाजात बदनामी झाल्याच्या रागातून केले कृत्य

पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावातील ही घटना आहे. भाचीच्या स्वागत समारंभासाठी आयोजित जेवणात विषारी औषध टाकल्याचा आरोप महेश जोतीराम पाटील या मामाावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाचीने गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केले होते. कुटुंबीयांनी तिच्या या लग्नाला मान्यता दिली. यामुळे समाजात बदनामी झाल्याच्या रागातून महेशने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

आचारीच्या सतर्कतेमुळे अनेकांचे वाचले प्राण 

भोजनाच्या तयारीदरम्यान महेशने विषारी औषध टाकताना आचारीने त्याला पाहिले. आचारीने तातडीने ही माहिती कुटुंबीयांना दिली. हा प्रकार समजताच महेश तिथून पळून गेला. पोलिसांनी महेशविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. गावात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आचारीच्या सतर्कतेमुळे गावातील अनेकांचे प्राण वाचले. या घटनेने गावकऱ्यांमध्ये मोठा धक्का बसला असून भविष्यात अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.