बहुजन चळवळीला धक्का ; दादासाहेब जगताप यांचे निधन

बहुजन चळवळीला धक्का ; दादासाहेब जगताप यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चळवळीत सक्रिय असलेले कॉँग्रेसचे  जेष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. बहुजन समाजाने जातीपातीच्या उतरंडीतून बाहेर पडून फुले-शाहू आंबेडकरांची विचारधारा जोपासली पाहीजे यासाठी ते आयुष्यभर प्रयत्न  करत राहीले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून  ते अनेक चळवळीत सक्रिय होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरात व्हावे याकरिता त्यांनी प्रयत्न केले. १९६९ ला ‘बहुजन समाज’ साप्ताहिकाचे प्रकाशन केले. 

बहुजन समाजाला जागे करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांच्या (२७ नोव्हेंबर १९७०) पुण्यतिथीला ‘फुले शाहू आंबेडकर विचार मंचा’ची स्थापना केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जगताप यांना दोन महीने शिक्षा झाली होती. जगताप हे सेंट्रल बॅंकेचे डायरेक्ट  सुध्दा होते. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या गव्हर्निग कौन्सिल कार्यकारिणीवर त्यांची संचालक म्हणून निवड झाली. त्यावेळी प्रिन्स शिवाजी बोर्डिंग संस्थेत न्यू कॅालेजची स्थापना करावी म्हणून जगताप यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यासैनिक शंकरराव नलवडे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न  केले.

कोल्हापूर महानगरपालिका होण्यासाठी प्रयत्न 

मुंबई  शहरातील क्रॅाफर्ड मार्केटला महात्मा जोतीराव फूले यांचे नाव देण्यातही त्यांचा वाटा होता. काळम्मावाडी धरण मंजूरीसाठी त्यांनी विषेश पाठपुरावा केला होता. कोल्हापूर नगरपालिकेची महानगरपालिका व्हावी म्हणून त्यावेळचे नगराध्यक्ष वसंतराव निगडे यांच्यामार्फत प्रयत्न केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या  नेतृत्वाखाली त्यांनी कॅाग्रेसचे काम निष्ठेने केले तसेच पक्षीय बांधिलकी त्यांनी शेवटपर्यंत जपली होती.