बेस्टच्या भाडेवाढीवर आदित्य ठाकरेंचा संताप; 'बेस्ट वाचवा'चा नारा

मुंबई: मुंबईकरांसाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील बेस्ट बससेवेचे भाडे लवकरच दुप्पट होणार आहे, ज्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा ताण येणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमासाठी बीएमसीने भाडेवाढीला मंजुरी दिली असून राज्य परिवहन आणि नगरविकास विभागाची अंतिम मंजुरी बाकी आहे.
नवीन निर्णयानुसार, नॉन-एसी बसेसचे किमान भाडे ५ रुपयांवरून १० रुपये, तर एसी बसेसचे भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये होणार आहे. बेस्टच्या आर्थिक परिस्थितीतील बिघाडामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बेस्टच्या या भाडेवाढीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, "बेस्टच्या दरवाढीला आमचा ठाम विरोध आहे! ही सेवा लाखो सामान्य मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी आहे. सरकारचा हेतू सामान्य माणसाच्या जगण्याला कठीण करणे आहे असे दिसते."
आदित्य ठाकरे यांनी पुढे अशी मागणी केली की, बेस्टमध्ये इलेक्ट्रिक बसांची संख्या वाढवावी, बसमार्ग सुधारावेत आणि सेवा दर्जेदार बनवावी. "बेस्ट वाचवा!" असा नारा त्यांनी दिला आहे.
दररोज ३१ लाखांहून अधिक प्रवासी बेस्टसेवांचा वापर करतात. त्यामुळे या निर्णयाचा मोठा सामाजिक आणि आर्थिक परिणाम होणार आहे.