भटक्या जमातीच्या विविध मागण्याबाबत आ. सतेज पाटील यांचा विधान परिषदेत प्रश्न

भटक्या जमातीच्या विविध मागण्याबाबत आ. सतेज पाटील यांचा विधान परिषदेत प्रश्न

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील नाथजोगी, नाथपंथी, डवरी, गोसावी, गोंधळी, वासुदेव, बागडी, चित्रकथी,मेंढरी या भटक्या जमातींच्या विविध मागण्यांबाबतचा तारांकित प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना सर्व जातींना आणि उपजातींना वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाकडून विविध कर्ज योजनांचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

राज्यातील नाथयोगी, नाथपंथी, डवरी, गोसावी, गोंधळी, जोशी,मेंढूरी, बगडी या भटक्या समाजाच्या विविध मागण्यांसाठी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एप्रिल महिन्यात निवेदन देण्यात आले असल्याकडं आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलं. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयांकडून असं कोणतेही निवेदन अद्याप शासनास प्राप्त झालं नसल्याचं इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. 

भटक्या समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तसंच जातनिहाय जनगणना करण्याबाबतचा प्रश्नही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी, भटक्या जमाती अंतर्गत येणाऱ्या 51 जाती आणि 43 उप जातीमधील समाजाला वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळा मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं विधिमंडळानं 8 जानेवारी 2020 रोजी एकमतानं संमत केलेला ठराव पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारच्या महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्ताकडे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.