Pahalgam Terror Attack: जनरल असीम मुनीर यांच्या विधानांचा हल्ल्याशी संबंध? केले होते भडकाऊ भाषण

Pahalgam Terror Attack: जनरल असीम मुनीर यांच्या विधानांचा हल्ल्याशी संबंध? केले होते भडकाऊ  भाषण

इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या एका भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी निर्दयपणे मुलांसमोर त्यांच्या वडिलांना आणि पत्नीसमोर नवऱ्यांना गोळ्या घातल्या. या क्रूर हल्ल्याची जबाबदारी ‘द रेसिस्टंट फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे अलीकडील विधान कारणीभूत ठरले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, असीम मुनीर यांनी काश्मीरला पाकिस्तानच्या गळ्याची नस असल्याचं सांगतानाच, हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत, असं वक्तव्य केलं होतं. हेच विधान TRF ला हिंसक कारवायेसाठी प्रोत्साहन ठरल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. हल्ल्यादरम्यान, दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे आणि धर्म विचारून निवडक लोकांना लक्ष्य केलं, हे विशेषतः जनरल मुनीर यांच्या वक्तव्याशी सुसंगत आहे.

गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. रावलकोटमधील अबू मुसा आणि इतर एका लष्करी कमांडरची भूमिकाही तपासली जात आहे. १८ एप्रिल रोजी रावलकोटमध्ये आयोजित कार्यक्रमात अबू मुसाने "काश्मीरमध्ये जिहाद सुरूच राहील" अशी घोषणा दिली होती.

भारतीय गुप्तचर संस्थांचं मत आहे की, जनरल मुनीर यांनी दिलेलं वक्तव्य हा एक जाणीवपूर्वक डाव होता. या विधानांमुळे पाकिस्तानमधील अतिरेकी गट पुन्हा सक्रिय झाले असून, भारताच्या वक्फ कायद्यातील बदलांवर आधारित असंतोष वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सहा दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी हल्ल्याचं नियोजन केलं होतं. एप्रिलच्या सुरुवातीला काही हॉटेल्सवर नजर ठेवून त्यांनी वेळोवेळी गुप्त हालचाली केल्या आणि योग्य संधी मिळताच हल्ला केला.