मंत्री मुश्रीफांकडून १७ लाख रुपये का आणले..? - सतीश पाटील

कोल्हापूर - मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज कारखाना सुरु राहण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वांनाच माहित आहेत. शहापूरकरांसह संचालक मंडळाला बोलावून चुका दुरुस्त करण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रिफांनी वेळोवेळी दिल्या आहेत. अध्यक्ष प्रकाश पाताडे यांच्या नेतृत्वाखाली येत्या दोन वर्षांत कारखाना चांगला चालवून दाखवू असं वक्तव्य जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आणि कारखान्याचे संचालक सतीश पाटील यांनी केले आहे.
गडहिंग्लज कारखान्याचे माजी संचालक शिवाजी खोत यांनी मंत्री मुश्रीफांसह सतीश पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली होती. शिवाजी खोत यांनी केलेल्या टीकेला सतीश पाटील यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. पत्रकात पाटील यांनी असे नमुद केले आहे की, बांधकाम अभियंता कोकितकर, स्व. कुपेकरांच्या विश्वासू सहकाऱ्यांवर हल्ला करणारा, बाजार समितीच्या माजी दलित संचालकाला मारहाण करणारा कोण, है जनतेला माहीत आहे. पुतण्या मेहुण्याच्या नावावर बाजार समितीची २८ गुंठे मोक्याची जागा कुणी घेतली, याचेही पुरावे आपल्याकडे आहेत. प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद उपाध्यक्षपदापर्यंत काम करण्याची संधी मला मिळाली. शरद सोया प्रकल्पाचे शासकीय भाग भांडवल भागवण्यासाठी मुश्रीफांकडून १७ लाख रुपये का आणले, याचे उत्तर शिवाजी खोत यांनी द्यावे. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी लक्ष्मी चौकात यायला मी बांधील नाही असा घणाघात सतीश पाटील यांनी केला. कुपेकरांचा विश्वासघात केलेल्यांनी निष्ठेची भाषा करू नये, असेही पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे.