मुख्यमंत्री फडणवीस यांची शिवजयंती दिनी शिवनेरीवरून मोठी घोषणा, म्हणाले ...

मुख्यमंत्री फडणवीस यांची  शिवजयंती दिनी शिवनेरीवरून मोठी घोषणा,  म्हणाले ...

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची 395 जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये साजरी केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या किल्ल्यावर शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किल्ल्यावर उपस्थित होते. 

शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना वाहिली. त्याचबरोबर पाळणा म्हणून शिवजयंती उत्साहामध्ये साजरी केली. यावेळी तरुणांची मोठी गर्दी किल्ल्यावर दिसून येत आहे. शिवनेरी किल्ल्यावर फुलांची आरास आणि सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रांगळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरी किल्ल्यावरून मोठी घोषणा केली  आहे. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शिवनेरीवर फडणवीस म्हणाले की,“छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते तर एक चांगले प्रशासक देखील होते. आम्ही त्यांच्या सर्व किल्ल्यांचा विकास करू. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केली आहे. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्यासाठी कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, “स्वराज्याची राजधानी रायगड येथे अनेक कामे आपण सुरू केले आहेत. मला सांगताना आनंद वाटतो की आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतला आहे. काही झालं तरी अतिक्रमणं तिथं राहाणार नाहीत,” असा  शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरीवर दिला आहे.