मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी गांधीनगरमध्ये घातला धुडगुस
कोल्हापूर प्रतिनिधी
मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी गांधीनगरमध्ये धुडगुस घातल्याने अनेक जण जखमी झाले. मोकाट कुत्री,गाढवे यांच्या बाबत गांधीनगर ग्रामपंचायतला वारंवार तक्रार देवूनही कारवाई न झाल्याने गेल्या दोन दिवसात पंचवीस जणांचा चावा पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला अशा ग्रामपंचायतीवर ताबडतोब कारवाई करावी व मोकाट कुत्री, गाढवे यांचा बंदोबस्त करावा तसेच गांधीनगर येथे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
गांधीनगर ग्रामंचायत प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एखदा पुढे आला आहे. मोकाट कुत्री, गाढवे यांचा बंदोबस्त गेली १० वर्षे ग्रामपंचायतीला करता आलेला नाही. गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेवून ८ जणांना जखमी केले होते. त्यावेळीही तक्रारी होवूनही ग्रामपंचायतीने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले एका बाजूला राज्य शासनाचे बांधकामाचे विहीत नियम व अटींचा भंग करून गांधीनगर मध्ये अतिक्रमणाचे जंगल उभा राहत आहे. याबाबत ग्रामपंचायत जाणीवपुर्वक डोळेझाक करत आहे. हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून पिसाळलेल्या कुत्र्यांने गांधीनगरमध्ये उच्छाद मांडला असून पंचवीस जणांना जखमी केलेले आहे. ग्रामपंचायतीला तक्रारी करूनही सरपंच ट्रेनिंगला गेलेत उपसरपंच सरपंच आलेनंतर बघू अशी उत्तरे मिळत आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याकडेही दुसऱ्या गावचाही कारभार आहे त्यामुळे त्या उपस्थित नाहीत अशा अवस्थेत ग्रामस्थांनी न्याय कुणाकडे मागायचा? गांधीनगरला कायम स्वरूपी ग्रामसेवक का मिळत नाही? कायम स्वरूपी ग्रामविकास अधिकारी का टिकत नाही? यामुळे अनेक समस्या उभ्या राहत आहेत. मोकाट कुत्री, गाढवे, पिसाळलेल्या कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने वेळोवेळी बंदोबस्त केला असता तर कुत्र्यांच्या चाव्यात २५ जण जखमी झाले नसते. ताबडतोब मोकाट कुत्री, गाढवे यांचा बंदोबस्त व्हावा. गांधीनगरला कायमस्वरूपी ग्रामसेवक उपलब्ध व्हावा तसे न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने, प्रशासक तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती करवीर माननीय विजय वसंत यादव यांना देण्यात आले.
व येत्या आठ दिवसात संबंधित ग्रामपंचायतीने मोकाट कुत्री व गाढवे यांच्या कारवाई नाही केली तर संबंधित ग्रामपंचायत मध्ये व पंचायत समितीमध्ये मोकाट कुत्री व गाढवे सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिला यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वय विक्रम चौगुले, उंचगाव प्रमुख दीपक रेडेकर, बाळासाहेब नलवडे फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख, दीपक पोपटानी फ्रेम वाला विभाग प्रमुख, वीरेंद्र भोपळे विभाग प्रमुख, दीपक अंकल शाखाप्रमुख, सुनील पारपाणी उपशाखाप्रमुख, दीपक धिगं गांधीनगर उपशहर प्रमुख, किशोर कामरा, जितू चावला, बाबुराव पाटील, भगवान पंजवाणी आदी शिवसैनिक उपस्थित होते.