"विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे सरकार येणार":संजय राऊतांचा मोठा दावा!
मुंबई (प्रतिनिधि) : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या ताकदीने मैदानात उतरले असून, नेत्यांचे मतदारसंघ दौरे, बैठका, मेळावे, आणि सभा यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. याच दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावरही चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत देखील आतापासूनच खलबतं सुरु झाली आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सूचक भाष्य करत विधानसभेनंतर ठाकरे सरकार येणार असल्याचा मोठा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय चर्चेला एक नवी दिशा मिळाली आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, राऊत यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील पक्षांतर्गत मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीतील महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत उत्सुकता वाढली आहे.