शिवसेना महिला जिल्हा संघटकपदी प्रतिज्ञा उत्तुरे
कोल्हापूर प्रतिनिधी -शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा संघटकपदी माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ आणि करवीर विधानसभा मतदारसंघ असे त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाचे सचिव व नेते विनायक राऊत यांनी ही निवड जाहीर केली आहे.
प्रतिज्ञा उत्तुरे यांनी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने कोल्हापूर शहरात गेल्या दोन वर्षांत अनेक सामाजिक प्रश्नांत लक्ष घालून ते तडीस नेले आहेत. कोल्हापुरातील पाणी प्रश्न, रस्ते, ड्रेनेज लाईन, रेल्वे स्टेशन वरील पादचारी उड्डाण पूल, शहरातील नागरिकांना विलंबाने मिळणारी पाणी बिले आणि त्यातून होणारी लूट आदी विषयी शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करुन शहरवासीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेना महिला शहर संघटक म्हणून केलेल्या उल्लेखनीय सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. त्याबरोबरच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी रिमा देशपांडे, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी जहिदा खान यांची शहर संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे.