सहा गावांसह हद्दवाढीचा निर्णय लवकरच...
कोल्हापूर प्रतिनिधी :- आरती सुतार
कोल्हापूरला लागून असलेल्या सहा गावांच्या हद्दवाढीचा निर्णय येत्या आठ दिवसांत होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे हद्दवाढ जाहीर करतील. इतर गावांच्या हद्दवाढीबाबतचा निर्णय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीत महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी प्रमुख उपस्थित होत्या.
मुश्रीफांनी शहरातील विविध प्रश्नांचा आढावा घेवून शहरातील विविध कामांचा आढावा घेतला. पालकमंत्री मुश्रीफ यांनी बोलताना, कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गावांत महानगरपालिकेच्या वतीने सेवा देण्यात येत आहेत. यात पाणी, केएमटीसह इतर नागरी मूलभूत सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे त्या सुविधांचा बोजा महापालिकेवर पुन्हा पडणार नाही. शहरातील जागेप्रमाणेच त्या गावातील जमिनीला भाव मिळत आहे. कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्याने उत्पन्नावर मर्यादा आहेत. मात्र खर्च अवाढव्य आहे. त्यामुळे त्या सहा गावांची हद्दवाढ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर त्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. येत्या आठवडाभरातच हद्दवाढीचा निर्णय घेण्यात येईल व लवकरच हद्दवाढीवर शिकामोर्तब केला जाईल असे त्यांनी सांगितले.