कचरा तसाच साठून, मग इतका खर्च कश्यावर ?

कचरा तसाच साठून, मग इतका खर्च कश्यावर ?

कोल्हापूरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय. लाखो टन कचरा साठून राहिला आहे. एकीकडे कचरा संकलन आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तरीही कचऱ्याचे डोंगर तसेच्या तसे आहेत. दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने लाईन बझारमधील झूम प्रकल्पावर कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर तयार झाले आहेत. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च कशावर केला जात आहे. त्यामुळे कचरा संकलन आणि विल्हेवाट केलेल्या कामाची आणि खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या कोल्हापूर शहरप्रमुख, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली आहे.

कोंडाळामुक्त कोल्हापूरसाठी महापालिकेने १६९ टीप्पर घेतले. परंतू टीप्पर वाहने घरोघरी दोन-चार दिवसांतून एकदा जात असल्याने चौकाचौकात, कोपर्यावर कचऱ्याचे ढीग आहेत. खासगी ठेकेदाराकडून घेतलेल्या टीप्पर चालकांवर वर्षाला ३ ते ४ कोटी खर्च केला जात. कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यावधींची उधळपट्टी सुरू आहे. तरीही विनाप्रक्रिया कचरा साठत आहे. सुमारे साडेचार लाख टन कचऱ्यावर बायोमायनिंगसाठी २० कोटींचा ठेका देण्यात आला मात्र कचरा तसाच आहे आणि ठेकेदार बीले उचलत आहेत. एकीकडे झूम परिसरात लाखो टन कचरा तसाच पडून साठत आहे. कोट्यावधी खर्च होऊनही कचरा प्रश्न सुटत नसेल तर मग खर्च कशावर केला जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाने कचऱ्याबाबतची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली आहे.