नागरिकांनी मतदार नोंदणी करुन मोहीम यशस्वी करावी : राहुल रेखावार

नागरिकांनी मतदार नोंदणी करुन मोहीम यशस्वी करावी :  राहुल रेखावार
जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट या क्रांती आठवड्यात मतदार नोंदणी आणि जागृती मोहीम

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान क्रांती आठवडा साजरा करण्यात येणार असून या आठवड्यात विविध कार्यक्रमांबरोबरच मतदार नोंदणी व मतदार जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील सहा महाविद्यालयांतील ईएलसीचे स्वयंसेवक बीएलओ यांच्यासोबत घरोघरी भेटी देवून मतदार नोंदणीच्या कामात सहाय्य करणार आहेत. यामध्ये अधिकाधिक नागरीकांनी मतदार नोंदणी करुन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एसएएएफ (Social Action Accountability Forum) यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी भेटी देऊन हे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज, डी.डी शिंदे सरकार कॉलेज, न्यू कॉलेज, गोखले कॉलेज, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आणि शहाजी कॉलेज या महाविद्यालयातील ईएलसीचे स्वयंसेवक बीएलओ यांच्यासोबत मतदार नोंदणीच्या कामात सहाय्य करणार आहेत.

विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती होण्यासाठी तसेच भावी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याविषयी, मतदान करण्याविषयी व लोकशाही विषयी त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने जिल्ह्यात जुलै 2022 पासून 31 शैक्षणिक संस्थांमध्ये निवडणूक साक्षरता मंच (ईएलसी) स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक साक्षरता मंच (बीएलसी) चे नोडल अधिकारी म्हणून शालेय/ महाविद्यालयीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅम्पस अम्बेसिडर म्हणून त्या कॉलेजमधील एक विद्यार्थी व एका विद्यार्थिनीची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक शाळा, महाविद्यालयातून 20 स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक साक्षरता मंचाव्दारे मतदार जागृती, मतदार नोंदणी, अधिकाधिक नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याबरोबरच लोकशाहीविषयी जागरुकता निर्माण करण्यासारखे लोकशाहीभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.