स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत सहा हजार हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत सहा हजार हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

कागल प्रतिनिधि:  श्री शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या 76 व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत 6,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती शाहू कला,क्रीडा,व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या.

  कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर व हायस्कूल ,मुरगुड येथे मुरगुड विद्यालय,सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालय व करवीर तालुक्यातील कणेरी येथील काडसिद्धेश्वर विद्यालय अशा चार केंद्रावर या स्पर्धा एकाच वेळी झाल्या. पहिली ते तिसरी, चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी,आठवी ते दहावी, मूकबधिर पहिली ते चौथी व मतिमंद अशा सहा स्वतंत्र गटात या स्पर्धा झाल्या. परीक्षक म्हणून विजय टीपुगडे, विजय उपाध्ये, विवेक कवाळे राजेंद्र वाघमारे यांनी काम पाहिले

    यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजेसाहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने 2002 पासून या स्पर्धा घेण्यात येत आहेत. स्पर्धेचे हे 23 वे वर्ष आहे. या स्पर्धेस विद्यार्थ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आता कागलसह मुरगूड,सेनापती कापशी व करवीर तालुक्यातील कणेरी अशा चार केंद्रावर घेण्यात येत आहेत.या स्पर्धेमुळे बालचित्रकारांना व्यासपीठ मिळत आहे.

  यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक व यशवंत उर्फ बाॕबी माने यांनी आपल्या प्रास्ताविकात स्व. राजेसाहेब यांच्या 76 व्या जयंती निमित्त त्यांचे विचार व कार्य याचा आढावा घेतला. व विद्यार्थ्यांच्या बक्षिस रकमेमधे चालू वर्षी पासून वाढ केलेली जाहीर केले.यावेळी संचालक राजू पाटील,प्रा.सुनील मगदूम, भाऊसाहेब कांबळे ,शाळेचे प्रशासन अधिकारी वेस्विकर आदी उपस्थित होते.आभार कारखान्याचे एच आर मॅनेजर बाजीराव पाटील यांनी मानले.सुरुवातीला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले.स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी केले.