खा. श्रीकांत शिंदेंना प्राप्तिकर विभागाची नोटीस ?

खा. श्रीकांत शिंदेंना प्राप्तिकर विभागाची नोटीस ?

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आल्याची चर्चा काल सुरू झाली. ही माहिती शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनीच माध्यमांसमोर दिली होती. मात्र, काही वेळातच त्यांनी आपल्या विधानावर यूटर्न घेतला, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला.

मंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः कबूल केलं की त्यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आली आहे. ही नोटीस 2019 ते 2024 या कालावधीत त्यांच्या संपत्तीमध्ये झालेल्या वाढीबाबत स्पष्टीकरण मागवणारी आहे. त्यांनी याच संदर्भात खा. श्रीकांत शिंदेंनाही नोटीस आल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर त्यांनी तो दावा मागे घेतला.

सरकारमधील अधिकृत सूत्रांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितलं की, श्रीकांत शिंदेंना प्राप्तिकर विभागाकडून कोणतीही नोटीस पाठवलेली नाही. अर्जांच्या छाननीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘सीएएसएस’ (Computer Assisted Scrutiny Selection) प्रणालीद्वारे नोटिसा पाठवल्या जातात आणि त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. संजय शिरसाट यांना आलेली नोटीस, हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात निर्माण झालेलं वादळ, शिवसेनेतील अस्वस्थता आणि ठाकरे गटाशी संभाव्य युती या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.