खा.सुप्रिया सुळेंना हॅकर्सची धमकी
मुंबई (प्रतिनिधी) : काल खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आज आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हॅकर्सनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून 200 डॉलर्सची खंडणी मागितल्याचं त्यांनी स्वतः ट्वीटद्वारे जाहीर केलं. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
तसंच, शरद पवार गटातील 20 पदाधिकाऱ्यांचे व्हाट्सअप अकाउंट्सही हॅक झाल्याचं समोर आलं आहे. या पदाधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप अकाउंट्सवरून 15 ते 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हे हॅकर्स त्यांच्याकडून खंडणी मागत असल्याचं वृत्त आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत. हॅकर्सना शोधून काढण्याच्या दृष्टीने तांत्रिक तपासणी आणि गुन्हे शाखेची पथके कार्यरत आहेत. सायबर पोलिसांकडून या हॅकर्सच्या मागील नेटवर्कचा शोध घेतला जात असून, लवकरच यावर अधिकृत माहिती देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सध्याच्या राजकीय परिस्थितीत या घटनांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.