ट्राफिक पोलिसांची दक्षता व तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला ; ट्राफिक ऑफिसकडून सत्कार

ट्राफिक पोलिसांची दक्षता व तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला  ; ट्राफिक ऑफिसकडून सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - 10 जून रोजी सायंकाळी पापाची तिकटी परिसरात एका मद्यधुंद चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत तीन महिलांना धडक दिली. ही घटना घडताच ट्रॅफिक पोलीस हवालदार बेळमकर व पोलीस अंमलदार करनूरकर यांनी तत्परता दाखवत त्या कारचा पाठलाग केला व वाहन थांबवून संबंधित चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या या कृतीमुळे मोठा अनर्थ टळला असल्यामुळे   ट्राफिक अंमलदारांचा ट्राफिक ऑफिसकडून सत्कार करण्यात आला.

10 जून रोजीच संध्याकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास तावडे हॉटेल चौकात ट्राफिक हवालदार ४३४ कोळेकर कर्तव्य बजावत होते. तेव्हा मोठा वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी ट्राफिक ऑफिसमधून पेट्रोलिंग पथक क्रमांक ३ ला बोलावले. हे पथक हवालदार ९१२ भोसले व हवालदार १६४९ खाडे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी पोहोचले आणि तिघांनी मिळून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, चौकात रहदारी नियमन करत असताना एका मोटरसायकलस्वाराने माहिती दिली की, कमानीजवळ एक इसम मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर पडलेला आहे व अपघात होण्याची शक्यता आहे. तिघेही अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी गेले असता, एक वृद्ध इसम हातात रोख रक्कम असलेले कागदी बंडल घेऊन बसलेला दिसला. चौकशीअंती त्या इसमाने सांगितले की, त्याचे नाव संपत महादू ढगे (वय ७५, रा. नारोली सुपा, पुणे) असून, तो पुणेच्या दिशेने प्रवासासाठी निघाला होता. त्याच्याकडे रोख ६८,००० रुपये व कांदा विक्रीची स्लिप होती.

मोटरसायकलस्वाराच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचे नातेवाईक मिळतात का, याची खात्री केली. संपर्क साधल्यावर त्याच्या मुलाने सांगितले की, कोल्हापुरातील नातेवाईक किरण सुतार व महेश धनके त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांनीच त्याच्या वडिलांना तसेच रक्कम सुरक्षित ताब्यात घ्यावी. त्यानुसार, संबंधित वृद्ध इसम व त्यांच्या कडील रक्कम व दस्तऐवज सुरक्षितपणे त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.