'या' गावातील स्मशानभूमीत घडला भानामतीचा अघोरी प्रकार

'या' गावातील स्मशानभूमीत घडला भानामतीचा अघोरी प्रकार

कोल्हापूर -  सध्या भानामतीचे अनेक प्रकार घडत आहेत. कोणी झाडाच्या फांदीवर कुटुंबातील सर्वांचे फोटो लावून भानामती करत आहे तर कोणी कोणी स्मशानात जाऊन भानामतीचा प्रकार करत आहे. असाच एक भानामतीचा प्रकार कसबा सांगाव या ठिकाणी घडलेला समोर आला आहे. कसबा सांगाव इथल्या कन्या शाळेसमोर स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत रक्षाविसर्जनासाठी गेलेल्या ग्रामस्थांना एक नारळ, दोन लिंबू आणि एका चिठ्ठीत मुला - मुलींची नावे ठेवली असल्याचं निदर्शनास आलं. या घटनेमुळे सांगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सांगाव गावातील एका कुटुंबातील वयस्कर महिलेचा दोन दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. त्यांच्या रक्षा विसर्जनासाठी ग्रामस्थ व पाहुणे स्मशानभूमीत गेले असता त्यांना एका चिठ्ठीत लिहिलेली नावे, लिंबू, नारळ ठेवून केलेला भानामतीचा प्रकार निदर्शनास आला. भोंदू बाबाच्या सांगण्यावरूनच हा प्रकार घडला असल्याच्या चर्चा सध्या गावात सुरू आहेत. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विवाहात येणारे अडथळे, एकतर्फी प्रेम आणि अशाच बऱ्याच गोष्टी सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे भानामती करणाऱ्या भोंदूबाबांकडे तरूणाईचा ओढा वाढत चाललेला आहे.