“फर्जंद नसता तर ‘छावा’ आलाच नसता”... 'या' मराठी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवली आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वाद निर्माण झाले असले तरी, चित्रपटाने तिकीटबारीवर विक्रमी यश मिळवलं. या यशावर मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर मोठं वक्तव्य केलं आहे.
‘तारांगण’ या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अजय पुरकर म्हणाले, "छावा सिनेमा फर्जंदमुळेच घडला. २०१८-१९ मध्ये जेव्हा फर्जंद प्रदर्शित झाला तेव्हा कुणालाही 'छावा'सारखा चित्रपट बनवायचा विचार नव्हता. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार या चित्रपटांमुळे लोकांना इतिहास महत्त्वाचा वाटू लागला." त्यांनी हेही स्पष्ट केलं की ही संपूर्ण टीमचं यश आहे आणि फर्जंद पासून सुरू झालेला प्रवास आता छावापर्यंत पोहोचल्याने त्यांना आनंद वाटतो.
“शिवचरित्रचं सादरीकरण स्थानिक भाषेतच प्रभावी”
अजय पुरकर यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण व्यक्त करत सांगितलं की, "शिवछत्रपतींचा इतिहास हिंदीतून तितक्याच प्रभावीपणे पोहोचू शकत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे." त्यांनी उदाहरण देत म्हटलं की, "जर मी महाराणा प्रताप यांची भूमिका मराठीतून केली, तर ती गोष्ट राजस्थानी प्रेक्षकांना पटेल का? भाषा आणि स्थानिकता यांचा इतिहासाशी असलेला संबंध खूप महत्त्वाचा असतो." मात्र त्यांनी हेही मान्य केलं की, चांगल्या कलाकारांच्या मदतीने डबिंगच्या माध्यमातून देशपातळीवर पोहोचणं शक्य आहे.