५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी उठवा : खा. धनंजय महाडिक

५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी उठवा : खा. धनंजय महाडिक

नवी दिल्ली : खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. ५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी घातलेली महाराष्ट्रातील एकतर्फी बंदी उठवावी आणि शेतकर्‍यांसह ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.

अजुनही कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या अनेक भागात, भारत तीन ए मानांकनाचे ५० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर जसेच्या तसे पडून आहेत. परिवहन खात्याकडून नोंदणी करून घेतली जात नसल्यानं, हे ट्रॅक्टर शेतकर्‍यांना वापरता येत नाहीत. ही अडचण खासदार महाडिक यांनी नामदार गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकर्‍यांच्या आणि ग्रामीण भागातील अर्थकारणासाठी ट्रॅक्टर महत्वाची भूमिका बजावतात.

कोल्हापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनकडून झालेल्या मागणीनुसार, खासदार महाडिक यांनी नामदार नितीन गडकरी यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. त्यानंतर नामदार गडकरी यांनी तत्काळ संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना आणि आदेश देवून, याबाबत शेतकरी हिताची भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरच ५० अश्वशक्तीच्या भारत ३ ए मानांकन असलेल्या ट्रॅक्टरची नोंदणी होईल आणि हे ट्रॅक्टर शेतकर्‍यांना वापरता येतील, अशी अपेक्षा आहे.