वाहन पासिंग विलंबशुल्क अखेर सरकारकडून रद्द : आम.सतेज पाटील यांच्या मागणीला यश
कोल्हापूर( प्रतिनिधी) : रिक्षा, टॅक्सी, लक्झरी बसेस आदी वाहनांच्या पासिंगसाठी आकारले जाणारे विलंबशुल्क आणि प्रादेशिक विभागाच्या अन्य जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करताना सरकारने वाहनांसाठीचे विलंब शुल्क रद्द केले आहे. या निर्णयानंतर कोल्हापुरात वाहनधारकांनी आनंद उत्सव साजरा केला.
रिक्षा, टॅक्सी, लक्झरी बसेस आदी वाहनांना वेळेत पासिंग न केल्यास प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन ५० रुपये विलंबशुल्क आकारण्यात आले होते. सदरचे विलंब शुल्क रद्द करा अशी मागणी करत वाहन धारकांनी राज्यभरामध्ये रस्ता रोको, जेलभरो आंदोलन केले होते. आमदार सतेज पाटील यांनी वाहनधारकांच्या विलंब शुल्काच्या प्रश्नावर विशेष उल्लेख सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले.
विधान परिषदेच्या उपसभापतींकडे सादर केलेल्या विशेष उल्लेख सूचना क्रमांक 12 नुसार, प्रादेशिक परिवहन विभागाकडून राज्यात वाहनधारकांवर जाचक अटी लावण्यात आल्यामुळे वाहनदार व डीलर यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. पासिंगसाठी प्रतिदिन ५० रुपये विलंब शुल्क आकारणे, पेपर ट्रान्सफर साठीची ओटीपी प्रणाली बंद करणे, सर्व वहाने दोन-तीन दिवसात ट्रान्सफर करणे आदी विविध मागण्याबाबत अनेक आंदोलने करूनही परिवहन विभागाने दुर्लक्ष दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारने या सर्व प्रकाराची चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचने द्वारे केली होती. आमदार पाटील यांच्या प्रश्नाची दखल घेऊन सरकारने वाहनधारकांचे विलंब शुल्क अखेर माफ केले.
*कोल्हापुरात आनंदोत्सव*
वाहनधारकांचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून न्याय दिल्याबद्दल वाहनधारक संघटनाने आमदर सतेज पाटील यांचे आभार मानले. वाहन धारक संघटनांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. या आनंद उत्सव सोहळ्यात चंद्रकांत भोसले, अरुण घोरपडे, राजेश जाधव, मोहन बागडे, ईश्वर चेनी, अविनाश दिंडे, रमेश पवार, राहुल पवार, अतुल पवार, यांच्यासह वाहन धारक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
*वाहन पसिंगचा विलंब शुल्क रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी वाहनधारक सातत्याने आंदोलन करत होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून हा प्रश्न सोडवता आला याचे मला मनस्वी समाधान व आनंद वाटत आहे.*
-आमदार सतेज पाटील, विधान परिषद, काँग्रेस गटनेते*