अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होणार ?
![अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होणार ?](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67a9bcd60ef88.jpg)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकरणातली सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे.
भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. या शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं भाजप काही जागा मनसेला सोडू शकतं, अशी माहिती आहे. अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर आमदार करुन भाजप आणि मनसेच्या मैत्रीचा नवा अंक सुरु होणार का ते पाहावं लागेल. अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक माहीम विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. माहीममध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. माहीमची निवडणूक तिरंगी झाली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा पराभव केला होता.
सध्या 'हे' आहेत भाजपचे विधानपरिषदेतील आमदार
राज्यपाल नामनिर्देशित कोट्यातून सध्या भाजपच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, शिवसेनेचे हेमंत पाटील, मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी विधानपरिषदेवर आमदार आहेत. 12 पैकी 5 जागा रिक्त असून या जागेवर महायुती कुणाला संधी देतं ते पाहावं लागेल.